धाराशिव, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
श्री तुळजाभवानी मंदिरात सोमवार, २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी पहाटे १ वाजल्यापासूनच विधींना सुरुवात होणार असून, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे पूजेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रगटनानुसार, सोमवार, २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थीनिमित्त पहाटे १ वाजता श्रीदेविजींचे चरणतिर्थ होईल. त्यानंतर पहाटे ३ वाजता पुजेची घाट होऊन श्रीदेविजींना अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान व अभिषेक पूजा करण्यात येईल. सकाळी ५-३० वाजता धुपारती होईल, असे कळवण्यात आले आहे.
तसेच, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या पूजेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सायंकाळची अभिषेक पूजेची घाट ही पूर्वापार प्रथेप्रमाणे भेंडोळी मंदिरातून गेल्यानंतर होईल व त्यानंतरच अभिषेक पुजेस प्रारंभ होईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.
या बदलेल्या वेळापत्रकाची सर्व महंत, पुजारी, सेवेधारी आणि भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis