रायगड, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
धामोते (ता. कर्जत) येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि संविधान स्तंभाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. धामोते गावाचे सरपंच महेश विरले व सामाजिक कार्यकर्त्या जोस्तना विरले यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला प्रारंभ झाला. या भूमिपूजनामुळे धामोते गावात सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक जाणीवेला एक नवे बळ मिळाले आहे.
यावेळी ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त साई मंदिर येथून भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत विविध समाजघटक, तरुण-तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात व जय भीमच्या घोषणांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते. ही रॅली धामोते गावातील भूमिपूजन स्थळी येऊन विसावली आणि पुढे डिस्कव्हरी हॉटेल येथे समता समिती नेरळ, धामोते, बोपेले, कोल्हारे यांच्या वतीने विजया दशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
भूमिपूजन कार्यक्रमात सरपंच महेश विरले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर प्रसार प्रत्येक पिढीत व्हावा, हीच भूमिपूजनामागची खरी भावना आहे. संविधान स्तंभ उभारणीमुळे संविधानातील तत्त्वे समाजासमोर जिवंत राहतील.” सामाजिक कार्यकर्त्या जोस्तना विरले यांनीही महिलांच्या सहभागाचे महत्व अधोरेखित करत समतेच्या चळवळीला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी प्रकाश गायकवाड, गणेश बगाडे, विशाल कोंगडे, प्राची जाधव, विशाल वाघ, अशोक गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गावातील तरुणांनीही या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या अखेरीस विजया दशमीच्या निमित्ताने उपस्थितांना समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. धामोते गावातील हा ऐतिहासिक उपक्रम सामाजिक सलोखा, समता आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसाराला नवे अधिष्ठान ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले. रोशन मस्कर,पपेश विरले,सोमनाथ विरले, वैष्णवी म्हसकर, सविता ताई कोळंबे आदी उपस्तित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके