मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात पहाटेच्या सुमारास एका चाळीत लागलेल्या भीषण आगीत १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे सुमारे चारच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील मच्छिमार नगर येथील एका चाळीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. इलेक्ट्रिक वाहनांच्या तीन बॅटरी, वीज जोडणी, वायरिंग तसेच घरातील वस्तूंना आग लागल्याने काही क्षणातच आगीने १० बाय १० फुटांच्या छोट्या खोलीत भीषण तांडव माजवले.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि बेस्टचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून चार जणांना आगीच्या विळख्यातून बाहेर काढले आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी १५ वर्षीय यश खोत या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत देवेंद्र चौधरी (३०) गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर विराज खोत (१३) आणि संग्राम कुर्णे (२५) हे दोघे जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासानुसार इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमधून ही आग भडकली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून नुकसानाचे प्रमाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे मच्छिमार नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule