
इस्लामाबाद, 25 ऑक्टोबर (हिं.स.)पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सध्याचे कसोटी कर्णधार शान मसूद यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि क्रिकेटपटू व्यवहार सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यामुळे त्यांना नवीन प्रशासकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मसूदपूर्वी पीसीबीने कधीही या पदावर कोणत्याही सक्रिय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची नियुक्ती केलेली नव्हती.
पीसीबीने म्हटले आहे की, हे पद तात्पुरते आहे आणि मसूद यांना अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. बहुतेक क्रिकेट बोर्डांमध्ये ही भूमिका एक वरिष्ठ प्रशासकीय पद आहे. पीसीबी आधीच या पदासाठी अर्ज मागवत आहे. ज्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर आहे. मसूद सध्या अंतरिम आधारावर हे पद भूषवतील.
उस्मान वहाला यांची यापूर्वी मे २०२३ मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पण सप्टेंबरमध्ये आशिया कप दरम्यान टीम इंडियाशी झालेल्या हस्तांदोलन वादानंतर पीसीबीने त्यांना निलंबित केले होते. खरं तर, आशिया कप लीग सामन्याच्या टॉस दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. भारतीय कर्णधाराची ही कृती पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ होती.
पीसीबीने आरोप केला आहे की, उस्मान वहाला यांनी हस्तांदोलन वादाबद्दल तक्रार दाखल करण्यास उशीर केला. जेव्हा त्यांनी नाणेफेकीच्या वेळीच कारवाई करायला हवी होती. पीसीबीने अद्याप त्यांच्या स्थितीबद्दल अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये खेळाडू आणि वहाला यांना शान मसूदच्या नवीन नियुक्तीची माहिती देण्यात आल्याची माहिती आहे.
पीसीबीने आपल्या अधिकृत निवेदनात मसूद किती काळ या पदावर राहतील किंवा तो कसोटी कर्णधार म्हणून कायम राहील की, नाही हे स्पष्ट केलेले नाही. मसूद गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानचा कसोटी कर्णधार आहे. त्याच्या कार्यकाळात पाकिस्तानने फक्त एकच कसोटी मालिका जिंकली आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका गमावणारा तो पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने एकूण १४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने गमावले आणि ४ जिंकले.
मसूदची नवीन भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करते. एक सक्रिय क्रिकेटपटू म्हणून, तो आता ज्या क्रिकेटपटूंसोबत खेळतो किंवा निवडतो त्यांच्या कारकिर्दीवरही देखरेख करेल. क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की, यामुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे