
जबलपूर , 25 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज, शनिवारी मध्यप्रदेशच्या जबलपूरला डेरेदाखल झाले. आगामी 3 नोव्हेंबरपर्यंत ते जबलपूर येथेच मुक्कामी राहणार आहेत. सरसंघचालक पहिल्यांदाच सलग 8 दिवस जबलपूरला वास्तव्य करतील. जबलपूरमध्ये 30,31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर दरम्यान संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलीय. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितल्यानुसार जबलपूर येथे होणाऱ्या बैठकीत संघाच्या कार्यांची सखोल समीक्षा केली जाणार आहे, तसेच शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांना अधिक गती कशी द्यावी यावर चर्चा केली जाईल संघाने आपल्या स्थापनेच्या शंभराव्या वर्षानिमित्त एक विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात हिंदू संमेलने तसेच जनसंवाद कार्यक्रमांचा समावेश केला आहे. या बैठकीत या कार्यक्रमांना अधिक गती देण्यावर निर्णायक चर्चा होईल. विशेषतः अनुसूचित जाती व जनजाती समुदायांना समरसता अभियानाच्या माध्यमातून संघाशी जोडण्याच्या धोरणावर चर्चा होईल.
बैठकीतील प्रमुख मुद्दे:
1. कार्यक्रमांची समीक्षा - शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांचा विस्तार आणि संचालनाची रूपरेषा.
2. समरसता अभियान - अनुसूचित जाती व जनजाती समुदायांना संघाशी जोडण्याच्या धोरणांची तयारी.
3. संघाची संघटनात्मक स्थिती - संघ शाखांच्या विस्तारावर आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदलावरील विचार.
संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील संघाची संघटनात्मक स्थिती खूप मजबूत आहे, विशेषतः जबलपूर येथील महाकौशल प्रांतात विविध सेवा व प्रचार कार्य सुरू आहेत. या बैठकीत जबलपूरकडून एक महत्त्वपूर्ण संदेश मिळेल.
प्रतिनिधी सभा व कार्यकारी मंडळाची बैठक:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन प्रमुख बैठका होतात - एक प्रतिनिधी सभा (जी मार्चमध्ये नागपूरमध्ये आयोजित केली जाते) आणि दुसरी अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक. कार्यकारी मंडळाची बैठक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आयोजित केली जाते. मागील वर्षी ही बैठक मथुरा येथे झाली होती. ही बैठक 'दिवाळी बैठक' म्हणूनही ओळखली जाते, कारण ती दिवाळी आणि दसऱ्याच्या आसपास आयोजित केली जाते. संघाचे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले की या बैठकीत शाखा विस्तारावर चर्चा होईल आणि काही प्रचारकांच्या दायित्वांमध्ये बदल देखील होऊ शकतात.
शाखा विस्तार:
संघाच्या शाखांचा वेगाने विस्तार होत आहे. शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांच्या तयारीच्या निमित्ताने मागील तीन वर्षांत बस्ती आणि मंडल स्तरावर शाखांचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या देशभरात संघाच्या 83 हजार शाखा आणि 32 हजार साप्ताहिक मिलन केंद्रे कार्यरत आहेत.
बैठकीत हे प्रमुख प्रतिनिधी असतील:
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सरकार्यवाह, सह सरकार्यवाह, प्रचारक
अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य45 प्रांत व 11 क्षेत्रांतील संघचालक
भाजपाचे संघटन मंत्री सहित 300 पेक्षा जास्त प्रतिनिधी
ही बैठक संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती जबलपूरहून महत्त्वाचा संदेश देईल.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी