
मुंबई, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। “हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही, तर खऱ्या मतदारांसाठी आहे.” त्यांनी नेत्यांना आवाहन केले की, “गल्ली ते दिल्ली” या मोर्चाची दखल सर्वांना घ्यायला भाग पाडा. त्यांनी आदेश दिला की हा मोर्चा “न भूतो न भविष्यती” अशा प्रभावी पद्धतीने पार पडला पाहिजे. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी नेत्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्या सूचनांनंतर मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चाच्या तयारीसाठी जोमाने कार्यरत झाले आहेत.
राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आता थेट एल्गार पुकारला आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये वाढलेल्या अनियमिततेच्या आणि खोट्या मतदारांच्या मुद्द्यावर विरोधकांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबरला मुंबईत विरोधकांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सक्रीयपणे सहभागी होणार आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी एक गंभीर आरोप केला होता की, महाराष्ट्राच्या मतदार यादीत तब्बल ९६ लाख खोटे मतदार भरले गेले आहेत. त्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये ८ ते १० लाख, ठाण्यामध्ये ८ ते ८.५ लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणात खोट्या मतदारांची भर घातली गेली आहे. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका करत म्हटले की, जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत.
राज ठाकरेंनी यावरून भाजपवरही हल्लाबोल करत म्हटले की, केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेत “आम्हीच पाहिजे” हे साध्य करण्यासाठी हे सर्व प्रकार रचले जात आहेत. मतदार यादीतील गोंधळ हा लोकशाही प्रक्रियेवर घाला असल्याचे सांगत त्यांनी याविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule