
नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
अतिवृष्टी आणि सततच्या हवामानातील बदलामुळे लाल कांद्याच्या रोपावर मावा, करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कांदापात पिवळी पडल्याचे दिसून येत आहे. लागवड केलेला कांदा शेतातच खराब होत असून महागड्या औषधांची फवारणी करुनही रोगांचा प्रादूर्भाव कमी होत नसल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकापाठोपाठ लाल कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.त्यात बाजार समितीत कांद्याला ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले असून कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. साधारणपणे लाल कांदा दसर्याच्या आसपास बाजारात येत असतो, मात्र यंदा बंगरुळू येथील किरकोळ लाल कांदा आवक वगळता राज्यातील कांदा उशिराने बाजार समितीत दाखल होईल. यंदा अतिवृष्टीचा फटका उन्हाळी आणि शेतात उभ्या असलेल्या लाल कांद्याला बसला आहे. अतिवृष्टी आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून पडणार्या पावसामुळे कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेती क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.लागवडीखालील क्षेत्र घटलेऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर लाल कांद्याची लागवड झाली. मागील वर्षी याच काळात लागवड ३० हजार हेक्टर इतकी होती. परिणामी यंदा खरीप कांद्याच्या लागवडीत ५० टक्के इतकी घट झाली आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामुळे लागवड उशिरा झाली आणि क्षेत्र घटले. लेट खरीप आणि एकूण लागवडीचा अंदाजसप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर खरीप आणि लेट खरिपाची लागवड झाली. या ५० हजार हेक्टर लागवडीपैकीपैकी सुमारे ४० हजार हेक्टरवरील पिकांचे सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे.लेट खरीप लागवडीत वाढखरिपात कमी लागवड आणि झालेल्या नुकसानीमुळे लेट खरीप (सप्टेंबर ते नोव्हेंबर) लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी यावर्षी लाल कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र कमी झाले असून, नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा मोठा फटका शेतकर्यांना बसला आहे. एकंदरीत जे काही लाल कांद्याचे उत्पादन हाती लागेल त्याला भाव मिळेल का? असा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे.शेतकर्यांची मोठी आर्थिक कोंडी
तर पिकावर रोटावेटर फिरवावा लागेल
तीन एकरवर रांगडा कांदा लावला आहे. कांदा काढावा म्हटले तरी २०० ते ३०० रुपये क्विंटल इतका दर मिळत आहे. त्यात मावा, करपा आणि मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पीक खराब होण्याची शक्यता असून दुहेरी संकट समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे बाजारात लाल कांद्याची आवक घटणार असून परिस्थिती अशीच कायम राहिली तर उभ्या पिकावर रोटावेटर फिरवावा लागेल.- सुभाष पालवे, शेतकरी, दोढी सिन्नर
१५ ते २० टक्के क्षेत्र घटणार
कांदा निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा शोधण्याची गरज आहे. अतिरिक्त उत्पादन होणार्या १.४५ लाख मेट्रीक टन कांद्याची निर्यात करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असून परकीय चलन मिळण्यास मदत होईल. तसेच नवीन येणार्या कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च भरून निघणे कठीण आहे. अतिवृष्टी, लहरी हवामान आणि दर नसल्याने लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होईल. साधारणपणे १५ ते २० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.- जयदत्त होळकर, संचालक, लासलगाव, मुंबई कृउबा समिती
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV