
मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence - AI) वाढत्या प्रभावामुळे रोजगारावर होणाऱ्या परिणामाची चर्चा काही काळापासून सुरू आहे. काही जणांनी एआयमुळे नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही, असा दावा केला असला तरी आता त्याचे वास्तव रूप समोर येऊ लागले आहे. जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननं तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, ही कपात लवकरच अधिकृतरीत्या जाहीर केली जाणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे याबाबत सूचित करण्यात येईल.
अॅमेझॉनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी नोकरकपात ठरणार आहे. सध्या कंपनीत सुमारे १५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात ३ लाख ५० हजार पदाधिकारी आहेत. यापूर्वी २०२२ पासून आतापर्यंत अॅमेझॉननं टप्प्याटप्प्याने सुमारे २७ हजार कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं, मात्र एकाच वेळी ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेस्सी यांनी करोना काळातच कर्मचारी कपातीचा मोठा कार्यक्रम राबवण्याचा संकेत दिला होता. कंपनीच्या रचना व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल करून, पातळी कमी करण्यावर त्यांनी भर दिला होता. याचबरोबर, जेस्सी यांनी या वर्षी जून महिन्यात कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये एआयच्या प्रभावामुळे येत्या काही वर्षांत कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येत घट होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांच्या मते, अनेक विभागांमध्ये स्वयंचलित (ऑटोमेटेड) प्रक्रिया लागू होत असल्याने मानवी संसाधनांची गरज कमी होत चालली आहे.
एआय तंत्रज्ञानाच्या व्यापक वापरामुळे जागतिक स्तरावर उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांवर गदा आली आहे. या वर्षभरातच सुमारे २०० हून अधिक तंत्रज्ञान कंपन्यांनी एकूण ९८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यात मायक्रोसॉफ्टनं १५ हजार, मेटानं ६००, गुगलनं ११०० तर इंटेलनं तब्बल २२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची आकडेवारी समोर आली आहे.
या घडामोडींकडे पाहता, एआयच्या वाढत्या वापरामुळे कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता वाढत असली तरी रोजगार बाजारावर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. अनेक कंपन्या मनुष्यबळ कमी करून तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. उद्योगजगताच्या या बदलत्या वास्तवामुळे भविष्यातील रोजगाराचे स्वरूप संपूर्णपणे बदलू शकते, अशी तज्ज्ञांचीही निरीक्षणे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule