
मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। ॲपल कंपनीने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच ४ ट्रिलियन डॉलर्स किंवा तब्बल ३५३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. हा आकडा भारताच्या सध्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) जवळपास आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी सध्या ४.१३ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच ३६४ लाख कोटी रुपयांचा आहे.
एनव्हीडिया आणि मायक्रोसॉफ्टनंतर हा टप्पा पार करणारी ॲपल ही जगातील तिसरी कंपनी ठरली आहे. सध्या एनव्हीडिया ही सर्वाधिक मौल्यवान कंपनी असून तिचे बाजारमूल्य ४.७१ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ४१५ लाख कोटी) इतके आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ४.०६ ट्रिलियन डॉलर्स (३५८ लाख कोटी रुपये) बाजारमूल्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ॲपल आता तिसऱ्या स्थानावर आहे.
२८ ऑक्टोबर रोजी ॲपलच्या शेअरची किंमत सर्वकालीन उच्चांक गाठत २६९.८७ डॉलर्स वर पोहोचली. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल पहिल्यांदाच ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले. सध्या मात्र किंचित घसरण होऊन शेअर २६८.५१ डॉलर्स वर म्हणजेच २३,६९८ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
ॲपलच्या बाजारमूल्यात झालेल्या या झपाट्याने वाढीमागे आयफोन १७ सिरीजचा मोठा वाटा आहे. ९ सप्टेंबरला लाँच झालेल्या आयफोन १७ सिरीजनंतर कंपनीचा स्टॉक १५ टक्क्याने वाढला आहे. लाँचच्या दिवशी ॲपलचा शेअर २३४ डॉलर्स (रु. २०,६५३) वर होता, तर आता तो जवळपास २७० डॉलर्सच्या उंबरठ्यावर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर नकारात्मक ट्रेंडमध्ये होता, मात्र आयफोन १७च्या यशानंतर तो पुन्हा तेजीच्या मार्गावर आला आहे.
काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीनमध्ये आयफोन १७ ची विक्री मागील मॉडेलपेक्षा तब्बल १४ टक्के जास्त झाली आहे. त्यामुळे ब्रोकरेज हाऊसेसना सप्टेंबर तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले निकाल लागण्याची आणि डिसेंबर तिमाहीतही सकारात्मक कामगिरी होण्याची अपेक्षा आहे.
तथापि, कंपनीसमोर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात काही आव्हाने आहेत. ॲपलची एआय रणनीती अद्याप स्पष्ट नाही, अशी टीका बाजार विश्लेषक झॅकरेली यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, “ॲपलने ग्राहकांना थक्क करणारे एआय फीचर्स सादर केले, तर संपूर्ण बाजारातील समीकरण बदलू शकते.” सध्या कंपनीने ‘Apple Intelligence Suite’ आणि ‘चॅटजीपीटी’ इंटिग्रेशन आणले आहे, परंतु सिरीचे एआय अपग्रेड पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. त्यातच अनेक वरिष्ठ एआय अधिकारी कंपनी सोडून मेटासारख्या प्रतिस्पर्ध्यांकडे गेले आहेत.
ॲपल सध्या अल्फाबेटच्या जेमिनी, अँथ्रोपिक आणि ओपनएआय यांसारख्या एआय कंपन्यांशी भागीदारीबाबत चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. एआय क्षेत्रात स्पर्धकांच्या तुलनेत मागे असल्याने काही काळ ॲपलच्या स्टॉकवर दबाव होता, परंतु नवीन उत्पादनांच्या दमदार विक्रीमुळे तो प्रभाव आता कमी होताना दिसतो.
एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने वर्षातील सर्वोत्तम निकाल नोंदवले असून सर्व विभागांमध्ये दुहेरी अंकी वाढ साध्य केली आहे. या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून बाजारात पुन्हा एकदा ॲपलची बादशाही दिसू लागली आहे. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल ३० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule