नवी दिल्ली , 3 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत आणि चीनने दीर्घ काळानंतर थेट हवाई उड्डाणं पुन्हा सुरू करण्यास सहमती दिली आहे. हा निर्णय गलवान संघर्षानंतर 5 वर्षांनी घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर, इंडिगो विमान कंपनीनं देखील 26 ऑक्टोबरपासून भारत आणि चीन दरम्यान थेट उड्डाणं पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
इंडिगोनं सांगितलं आहे की, अलीकडील राजकीय पुढाकारानंतर विमान कंपनीनं चीनसाठी आपली सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 26 ऑक्टोबर 2025 पासून कोलकाता आणि ग्वांगझू दरम्यान दररोज नॉन-स्टॉप उड्डाणं सुरू होतील. एअरलाइननं असंही सांगितलं आहे की, लवकरच दिल्ली आणि ग्वांगझू दरम्यान थेट उड्डाणं देखील सुरू केली जातील. या उड्डाणांसाठी Airbus A320neo विमानांचा वापर केला जाईल. या उड्डाणांमुळे दोन्ही देशांमधील व्यापार, धोरणात्मक भागीदारी आणि नवीन पर्यटनाच्या संधी पुन्हा स्थापित होतील.
परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, या वर्षाच्या सुरुवातीपासून, भारत आणि चीनमधील संबंध हळूहळू सामान्य करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांच्या नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि हवाई सेवा करारात सुधारणा करण्यासाठी तांत्रिक स्तरावर चर्चा केली आहे. खरं तर गलवान वादानंतर थेट हवाई उड्डाणं थांबवण्यात आली होती आणि नंतर कोविड-19 साथीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, भारत आणि चीन दरम्यान थेट उड्डाणे ऑक्टोबर 2025 च्या अखेरीस सुरू होतील. या उड्डाणांसाठी दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांकडून व्यावसायिक परवानगी घेणं तसेच सर्व ऑपरेटिंग नियमांचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या लोकांमधील संपर्क सुलभ होईल, तसेच, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल आणि द्विपक्षीय संबंध हळूहळू सामान्य होतील. हे पाऊल दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि संबंध सामान्य करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode