पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। पोलिसांनी कुख्यात बंडू आंदेकर, नीलेश घायवळ आणि रिझवान ऊर्फ टिपू पठाण यांच्या बेकायदा मालमत्तांवर जप्ती, अतिक्रमणावरील कारवाया आणि बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांनी कोथरूड, कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, सहकारनगर, कात्रज, येरवड्यासह इतर भागातील सराईत टोळ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आंदेकर टोळीने आयुष कोमकर या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर नीलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी कोथरूडमध्ये एका तरुणावर जीवघेणा गोळीबार केला. यापूर्वी कोंढव्यात गुंड टिपू पठाणने महिलेची जागा बळकावल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.कुख्यात टोळ्यांतील सराईत गुंडांकडून वाहनांची तोडफोड आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई वाढवली आहे. तरीही गुंडगिरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु