राष्ट्रसेविकांचे कार्य राष्ट्र वैभवासाठी : भाग्यश्री साठ्ये
राष्ट्रसेविका समितीतर्फे अमरावतीत विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्र वैभवशाली व्हावे म्हणून कार्य करणाऱ्या सेविका जिथे एकत्रित येतात आणि चारित्र्य निर्माण करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करतात तीच राष्ट्रसेविका समिती होय.
राष्ट्रसेविकांचे कार्य राष्ट्र वैभवासाठी : भाग्यश्री साठ्ये विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन


राष्ट्रसेविका समितीतर्फे अमरावतीत विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन

अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

राष्ट्र वैभवशाली व्हावे म्हणून कार्य करणाऱ्या सेविका जिथे एकत्रित येतात आणि चारित्र्य निर्माण करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करतात तीच राष्ट्रसेविका समिती होय. स्वयंप्रेरणेने कार्य करणारी ही महिला संघटना आज 90 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्या व महिला समन्वयाच्या सहसंयोजिका भाग्यश्री साठ्ये यांनी केले.

राष्ट्रसेविका समिती अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम शनिवारी सायंकाळी श्री समर्थ हायस्कूलच्या प्रांगणात आयोजिण्यात आला होता. त्यावेळी त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या. सर्वांच्या मनात चैतन्य निर्माण करीत पुढे त्यांनी आरएसएस म्हणजे रेडी फॉर सेल्फलेस सर्विस आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समिती या दोन्ही संघटना निस्वार्थ वृत्तीने सेवा करणाऱ्या आहेत. एखाद्या संघटनेने 100 वर्ष पूर्ण करणे ही एक तपश्चर्याच आहे. याला त्यांनी सतत वाहणाऱ्या गंगेची उपमा दिली. प्रारंभी देवी अष्टभुजा, वंदनीय मावशी केळकर, वंदनीय ताई आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून संरक्षणाचे साधन म्हणून शस्त्रपूजन झाले. ध्वजारोहण, ध्वजवंदन व प्रार्थना होऊन कार्यक्रमास अत्यंत शिस्तीत प्रारंभ झाला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सीए. स्वाती पुरोहित उपस्थित होत्या. त्यांनी महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे किती आवश्यक आहे, या संदर्भात उत्तमरीत्या मार्गदर्शन केले.प्रास्ताविक करताना महानगर कार्यवाहीका गौरी लवाटे म्हणाल्या, विजयादशमी हा राष्ट्रसेविका समितीच्या स्थापनेचा दिवस होय. 90 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी वंदनीय मावशी केळकर यांनी वर्धा येथे महिलांच्या संघटनेची स्थापना केली तोच हा दिवस. मावशींनी लावलेले हे रोप आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. असत्य,अन्याय, असूरी शक्तीवर सत्य, न्याय, दैवी शक्तीचा मिळवलेला विजय म्हणजे विजयादशमी होय. हे वर्ष संघ शताब्दीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर सेविकांचे विविध स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके व घोषवादन उत्तमरीत्या सादर झाले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम'ने झाली. कार्यक्रमाला नगरातील अनेक महिला मंडळ व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या. राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत अधिकारी, विदर्भ, जिल्हा अधिकारी व ज्येष्ठ, श्रेष्ठ सेविका उपस्थित होत्या. अनेक संघ बंधू उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande