अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
हिंदुत्व हे सर्वांना जोडणारे तत्व असून, हिंदुत्वाचा मंत्र एकत्वाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गत शंभर वर्षांपासून याच मंत्राच्या आधारे काम करीत आहे, असे प्रतिपादन रा. स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. ते येथील गोरक्षण मार्ग स्थित एकविरा मैदानात रविवारी सायंकाळी आयोजित अकोला महानगराच्या विजयादशमी उत्सवात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी शिवप्रकाश रुहाटिया, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांची उपस्थिती होती.
शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रहीत, सामाजिक दूरदृष्टी ठेवून डॉ हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.त्यानंतरच्या काळात अनेक संकट आली मात्र ते दूर करून संघ शताब्दी साजरी करीत आहे. जे सात्विक आहे ते टिकले पाहिजे, दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट झाला पाहिजे.यासाठी संघाचे कार्य पुढील काळात प्रभावी होण्यासाठी समाजातील सज्जन शक्तीला पुढे यावे लागेल. संघाचा शंभर वर्षाचा प्रवास आणि त्याचा परिणाम हा कानाकोपर्यात पोहोचला आहे.पण पुढील काळात पंच परिवर्तन अर्थात सामाजिक समसरता, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि स्वदेशी, स्वबोध हे समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वीकारले पाहिजे. या साठी शताब्दी वर्षात जनजागरण करण्यात येणार असून त्यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शताब्दी वर्ष उत्सवाचे नव्हे तर संकल्पाचे असल्याचेही ते म्हणाले.
प्रभू श्रीराम हीच देशाची ओळख आहे. मात्र असे असताना देखील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारण्यासाठी सुमारे ५०० वर्षे लढा द्यावा लागला. अनेकांना आता खर्या हिंदुत्वाची ओळख होत असून हिंदू असल्याचा स्वाभिमान द़ृढ होत आहे. मुळात हिंदुत्व सर्वांना जोडणारे, एकसंघता शिकविणारे आणि जीवनशैली असलेले तत्व आहे. पण दुर्दैवाने याचा विसर पडला आणि धर्माच्या आधारे देशाचे विभाजन झाले. धर्म बळकट व्हावा यासाठी आपल्या संस्कृतीत विजयादशमी निमित्ताने शिवशक्ती आराधना केली जाते, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी प्रमुख अतिथींनी शस्त्र पूजन केले. ध्वजारोहणानंतर स्वयंसेवकांनी विविध प्रात्याक्षिक सादर केली.
आदिवासींमधील धर्म परिवर्तन संघाने थांबविले
आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन होत आहे ते थांबवण्याचे काम संघ करीत असल्याचे यावेळी बोलताना उद्योजक शिवप्रकाश रुहाटीया म्हणाले. भूकंप, कोविड, पूरस्थिती अशा ठिकाणी स्वयंसेवक उभे राहतात. विदर्भात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या होतात. त्यामुळे ही परिस्थिती कशी बदलता येईल यासाठी संघाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे