रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महापालिका शिक्षक संघाच्या सातव्या शिक्षक गुणगौरव समारंभात सातारा येथील कार्यक्रमात रत्नागिरीच्या दामले विद्यालयाला राज्यस्तरीय प्रेरणादायी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत सन्मान प्रदान सोहळा पार पडला. दामले विद्यालयाच्या सौ. श्रद्धा गांगण यांना राज्यस्तरीय सक्षम महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दामले विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणामुळे नावारूपाला येत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत मोठी शासकीय पटाची शाळा बनण्याचा मान मिळवला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षांमधील यश, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात शाळेने केलेले सातत्यपूर्ण काम लक्षात घेऊन त्याचा गौरव म्हणून शाळेची निवड झाली. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक भगवान मोटे आणि सहकारी शिक्षकांनी पुरस्कार स्वीकारला.
शाळेच्या विकासासाठी आणि पटवाढीच्या प्रयत्नांत सदोदित आग्रही असणाऱ्या, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनाबद्दल सौ. गांगण यांना गौरविण्यात आले.
शाळेच्या यशाबद्दल प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे आणि समिती सदस्यांनी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी