नांदेड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)शंभर खाटांची व्यवस्था असलेल्या मुदखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राला दोन हेक्टर जागा प्राप्त झाली आहे लवकरच हे केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्री जया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत मुदखेड येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न सुरु केले होते. या प्रयत्नांना यश आले असून, या केंद्रासाठी मुदखेड नगर परिषदेच्या हद्दीतील गट क्र. ४६० मधील जलसंपदा विभागाची बिनवापर पडून असलेली २ हेक्टर जमीन कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यास संमतीपत्र मिळाले आहे.
या केंद्राच्या उभारणी प्रक्रियेची ही सुरुवात असून, पुढील काळात सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा, यासाठी आम्ही अधिक जोमाने प्रयत्न करणार आहोत. असे आमदार चव्हाण म्हणाल्या. मुदखेड येथे नियोजित ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात रुग्णांच्या उपचारासाठी १०० खाटांची व्यवस्था असेल. याशिवाय सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, मायक्रोबायोलॉजी लॅब, बायोकेमेस्ट्री लॅब, एक्सरे मशीन, होस्टेल, निवासी डॉक्टरांसाठी निवासस्थाने आदी सुविधा देखील उभारल्या जातील. हे केंद्र उभारल्यानंतर मुदखेड शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी उपचारांची एक उत्तम सुविधा उपलब्ध होईल. असेही त्यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis