चंद्रपूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)।‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत जिल्ह्यात 2 लक्ष 40 हजार 623 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात प्रामुख्याने 1 लक्ष 54 हजार 294 महिलांचा सहभाग होता. महिलांचे आरोग्य सुदृढ करणे आणि कुटुंब सशक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेले ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ हे व्यापक आरोग्य अभियान चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 6756 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये 177 आरोग्य संस्थामध्ये विशेषज्ञ वैद्यकीय शिबिरे तर उपकेंद्र स्तरावर तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या अभियानामध्ये महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विविध आरोग्य चाचण्या, सल्ला व उपचार सेवा देण्यात आल्या. सदर अभियानामध्ये 1 लक्ष 25 हजार 168 लाभार्थ्याची रक्तदाब तपासणी, 1 लक्ष 16 हजार 655 लाभार्थ्यांची मधुमेहाची तपासणी करण्यात आली.
तर तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशया मुखाच्या कर्करोगाची 1 लक्ष 69 हजार 179 लाभार्थ्यांची तपासणी तसेच 27471 लाभार्थ्यांची क्षयरोग तपासणी, 10659 लाभार्थ्याची सिकलसेल तपासणी करण्यात आली. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये 826 रक्तदात्यांनी रक्तदान केले. अभियानाच्या यशामध्ये आरोग्य विभागासह महिला व बालकल्याण, ग्रामविकास, शिक्षण, पोषण मिशन इत्यादी विविध विभागांनी एकत्रितपणे सहभाग नोंदविला. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. जनजागृती कार्यक्रम, शिबिरे आणि जनसंपर्काद्वारे या मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून अनेक महिलांना वेळीच उपचार मिळाले आहेत. भविष्यातील धोरण आखणीसाठी मिळालेला आरोग्यविषयक डेटा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव