नाशिक, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : अलीकडच्या काळामध्ये नाशिक शहराच्या अवतीभोवती बिबट्याचा वावर वाढलेला दिसून येत आहे. बिबट्यांचे मानवावरील हल्ले रोखण्यासाठी वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. यासाठी वनविभागाने संशोधन करण्यास सुरुवात केलेली आहे. बिबट्यांसाठी स्वतंत्र क्षेत्र आरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन जी. यांनी केले. मविप्रच्या गंगापूर रोड येथील आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहामध्ये नाशिक वनवृत्ततर्फे मानव-विवट सहजीवन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, कृष्णा भवर विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे व डॉ. सुजितनेवसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांनी केले. बिबट्यांचे वर्तन आणि मानवी बिबट्यासह जीवनावरील संशोधन, मानव-बिबट्या जनजागृती, प्रसारमाध्यमांची भूमिका, रेस्क्यू ऑपरेशन, नागरिकांमध्ये जनजागृतीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये वाइल्ड लाइफ कंझर्व्हेशन सोसायटीचे निकित सुर्वे, रणजित जाधव, अक्षय मंडावकर, विराट सिंग, महाराष्ट्र वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई फॉर एसजीएनपी यांनी चर्चासत्रामध्ये भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांनी केले. यावेळी सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, संतोष सोनवणे, नीलेश कांबळे, शिवाजी सहाने, कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, योगेश साळवे इत्यादी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV