छ. संभाजी नगरात मुदतबाह्य तुपाचा २ लाख ८९ हजारांचा साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) सणासुदीच्या दिवसांत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विशेष मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने कारव
अ


छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) सणासुदीच्या दिवसांत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विशेष मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने कारवाई करुन गोवर्धन तुपाचा २ लाख ८९ हजार ३८० रुपयांचा विक्री मुदत संपलेला साठा जप्त केला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त द. वि. पाटील यांनी दिली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने छत्रपती संभाजी नगर-मुंबई हायवे, करोडी, छत्रपती संभाजीनगर येथील पारीस मिल्क फूड्स लि. गट क्र. १९१ या ठिकाणी गोवर्धन गाईच्या तुपाचा साठा तपासला. या तपासणीत, १८.४ किलोग्रॅमचे ३६४.८ लिटर आणि १६.४ किलोग्रॅमचे ३८४.८ लिटर अशा एकूण १८२४ कागदी बॉक्समध्ये विक्रीसाठी ठेवलेला तूप साठा आढळून आला. या तुपाच्या साठ्याची वापर कालावधीची मुदत (एक्सपायरी) होऊन गेल्याचे तपासणीत उघड झाले. प्रशांत कुचेकर यांनी या साठ्यातील काही नमुने घेऊन उर्वरित २ लाख ८९ हजार ३८० रुपये किमतीचा साठा निकृष्ट दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त केला आहे.

या प्रकरणी, पुढील कार्यवाहीसाठी जप्त केलेल्या तुपाचे नमुने अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त (अन्न), विवेक पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील सर्व अन्न व्यावसायिकांना निकृष्ट व भेसळयुक्त पदार्थ तयार करू नयेत. तसेच ते ग्राहकांना विकू नयेत असे आवाहन केले आहे. सर्व व्यावसायिकांनी जनतेला निर्भेळ, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावे व नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande