नवी दिल्ली , 7 ऑक्टोबर (हिं.स.)।येत्या २३ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान अयोध्येमध्ये रामजन्मभूमी परिसरात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होऊ शकतात. माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांना या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी चंपतराय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती त्यांनी केली होती. जर पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले, तर ही त्यांची अयोध्येची सहावी भेट ठरेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रपती भवनाकडून अद्याप त्यांच्या आगमनासंदर्भात कोणतीही अधिकृत सहमती मिळालेली नाही.तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा या कार्यक्रमात सामील होणे निश्चित झाले आहे. श्रीरामजन्मभूमी परिसरात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले मंदिरांचे बांधकाम ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे.त्यामुळे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट या ऐतिहासिक क्षणाला एक भव्य उत्सवाच्या माध्यमातून स्मरणीय बनवू इच्छित आहे. या आयोजनासाठी सुमारे १०,००० मान्यवर अतिथींना आमंत्रण देण्याची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान राम मंदिरासह परिसरातील पूरक अशा सात मंदिरांच्या शिखरांवर सनातन ध्वज फडकवले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी ट्रस्टने काही दिवसांपूर्वी पीएमओ आणि राष्ट्रपती भवन यांना चिट्ठी पाठवून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना आमंत्रित करण्याची विनंती केली होती.हा कार्यक्रम केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग नसून, भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode