शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य गाठण्यासाठी उपाययोजना राबवा - दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारत सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने ‘शून्य अपघाती मृत्यू जिल्हा’ या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूदर शून्यावर आणण्यासा
Q


छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारत सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने ‘शून्य अपघाती मृत्यू जिल्हा’ या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होत असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांची निवड भारत सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयामार्फत एका सर्व्हेक्षणाद्वारे करण्यात आली आहे. या जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, पोलीस उपायुक्त वाहतुक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लढ्ढा, अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते

बैठकीत माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०२४ मध्ये ३७३ अपघात झाले त्यात ४६८ मृत्यू झाले. तसेच सन २०२५ मध्ये ४०३ अपघातात ५०८ जणांचे मृत्यू झाले, अशी आकडेवारी सेव्ह लाईफ फाऊंडेशन या संस्थेने सर्व्हेक्षण करुन दिली आहे. अपघात टाळता यावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यात अपघात प्रवण स्थळे निश्चित करुन तेथे रस्ते सुरक्षा उपाययोजना राबविणे, आपत्कालिन परिस्थितीत जखमींना उपचार सुविधा देण्यासाठी लागणारा कालावधी कमी करणे, वाहन चालवितांना वाहन चालकांकडून होणाऱ्या नियमभंगांविरुद्ध कारवाई करणे याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात एकूण ६६ अपघातप्रवण स्थळे आहेत. या स्थळांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे आवश्यक अभियांत्रिकी बदल, सुचना, दिशा फलक लावणे, नजिकच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे इ. उपाययोजना राबविण्यासाठी ९ कोटी रुपयांचा आराखडाही परिवहन विभागाने आज सादर केला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक असणे ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचे दर कमी करुन ते प्रमाण शून्यावर आणण्यासाठी संबंधित प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी. त्यानुसार उपाययोजना राबवाव्या. वाहन चालक हा यातील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या आरोग्य तपासणीपासून, समुपदेशनापर्यंत उपाययोजना राबवाव्या. दिवाळीच्या सुटीत स्कुल बसच्या वाहन चालकांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. अन्य ट्रक व बसेस चालकांचीही आरोग्य तपासणी व समुपदेशन गटागटाने करण्यात यावे. अपघातप्रवण क्षेत्राच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतराने सुचना फलक लावावे. अपघातप्रवण स्थळांच्या जवळ रुग्णवाहिका व वैद्यकीय सुविधांची उपलब्धता ठेवणे, जनजागृती करणे अशा उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande