नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे उपरोक्त विषयावर आता 12 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर न्यायालयाने ही पुढील तारीख दिली आहे. या निर्णयामुळे 'धनुष्यबाण' कुणाचा, या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कायद्यानुसार आमची बाजू भक्कम - आमदार संजय शिरसाट
न्यायालयात आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. कायद्यानुसार आमची बाजू भक्कम आहे. न्यायालय जो काही निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. प्रत्येकवेळी न्यायालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं ही उबाठा गटाची मानसिकता झाली आहे. निकाल आमच्या विरोधात संविधानानुसार, त्यांच्याविरोधात लागला तर संविधानाचा भंग, मग न्यायालयावरती ताशेरे ओढायला ते कमी करणार नाहीत. राज्यघटना मान्य आहे की नाही ते सांगा? जो निकाल लागेल तो मान्य करावा लागेल. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय सगळीकडे आम्ही आमची बाजू भक्कम मांडली आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली.
शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिवसेना हे एकनाथ शिंदे गटाला बहाल केले होते. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाचा मुख्य दावा आहे की, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. हा वाद आतापर्यंत प्राथमिक सुनावण्यांच्या टप्प्यातून पुढे सरकला. दरम्यान १२ नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी या प्रकरणाच्या अंतिम निर्णयासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी