ऍड. राकेश किशोर यांची तात्पुरती नोंदणी रद्द
सरन्यायमूर्तीच्या कथित अवमाननेचे प्रकरण नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : सरन्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी कथित गैरवर्तन करणारे वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालय वकिल संघटनेने कठोर कारवाई केली आहे. संघटनेच्या कार्यकारिणी समितीने रा
ऍड. राकेश किशोर


सरन्यायमूर्तीच्या कथित अवमाननेचे प्रकरण

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : सरन्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी कथित गैरवर्तन करणारे वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालय वकिल संघटनेने कठोर कारवाई केली आहे. संघटनेच्या कार्यकारिणी समितीने राकेश किशोर यांची तात्पुरती नोंदणी रद्द केली असून, त्यांचा प्रवेश पास देखील रद्द करण्यात आला आहे.

कार्यकारिणी समितीने गुरुवारी एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये या घटनेचे वर्णन गंभीर गैरवर्तन म्हणून करण्यात आले. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी घडली होती. समितीने म्हटले की, अशा प्रकारचे शिस्तभंग करणारे व असभ्य वर्तन कोणत्याही न्यायालयातील अधिकार्‍यासाठी पूर्णतः अयोग्य असून, ते व्यावसायिक आचारसंहिते, न्यायालयीन सौजन्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे.समितीने हेही स्पष्ट केले की, राकेश किशोर यांचे वर्तन हे न्यायालयीन स्वातंत्र्य, न्यायालयीन कार्यवाहीच्या पवित्रते, तसेच बार आणि बेंच यांच्यातील परस्पर सन्मान व विश्वासाच्या संबंधांवर थेट आघात करणारे आहे.सखोल विचारविनिमयानंतर, कार्यकारिणी समितीने असा निष्कर्ष काढला की राकेश किशोर यांचे संघटनेचे सदस्य म्हणून राहणे ही संघटनेच्या प्रतिष्ठेला व शिस्तीला धरून नाही. त्यामुळे, त्यांची सदस्यता तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावी आणि त्यांचे नाव सदस्यांच्या यादीतून काढून टाकण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.

ऍड. राकेश किशोर यांच्यासाठी एससीबीएकडून जारी केलेले सदस्यत्व कार्डही रद्द करून जप्त करण्यात आले आहे. संघटनेने सर्वोच्च न्यायालय सचिवालयासही कळवले आहे की त्यांचा न्यायालय परिसरातील प्रवेश पास तत्काळ रद्द करण्यात यावा.हा निर्णय सर्व संबंधित सदस्य व अधिकार्‍यांना कळवण्यात येणार असून, आवश्यक ती कारवाई सुनिश्चित करण्यात येईल.

एससीबीएने आपल्या ठरावात पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, संघटना न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा, कायद्याच्या व्यवसायाचा सन्मान आणि घटनात्मक मूल्यांचा पूर्ण आदर करते. न्यायालयीन यंत्रणेचे स्वातंत्र्य, शिस्त व सन्मान हे न्यायव्यवस्थेच्या पाया आहेत आणि त्याला कोणतीही आव्हान देऊ शकत नाही.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande