वैशाली जिल्ह्यातून शस्त्रांसह एका आरोपीला केली अटक
वैशाली, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहारमधील हत्यार तस्करीप्रकरणी गुरुवारी मोठी कारवाई केली. वैशाली जिल्ह्यातील संदीप कुमार सिन्हा उर्फ छोटू लाला याच्या घरी छापा टाकून अनेक हत्यारे व संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आली.
ही छापेमारी 2024 मध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासाअंतर्गत करण्यात आली असून, हा प्रकरण नागालँडहून बिहारमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर हत्यार तस्करीशी संबंधित आहे.
एनआयएने टाकलेल्या छाप्यामध्ये 9 एमएम पिस्तूल, 18 जिवंत काडतुसे, 2 मॅगझिन,
डबल बॅरल 12-बोर बंदूक, 12-बोरची 35 काडतुसं, 4 लाख 21 हजार रोख असे साहित्य जप्त करण्यात आले. संदीप कुमार हा मुख्य आरोपी विकास कुमार याचा निकटवर्तीय असून, या तस्करी रॅकेटचा सक्रिय सदस्य असल्याचे मानले जाते. हे प्रकरण सुरुवातीला बिहार पोलिसांनी नोंदवले होते, जेव्हा एरे-47 रायफल आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आला होता. ऑगस्ट 2024 मध्ये एनआयएने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
तपासादरम्यान, एनआयएने विकास कुमार, सत्यम कुमार, देवमणी राय उर्फ अनीश, आणि मोहम्मद अहमद अंसारी या चार आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. अलीकडेच मंजूर खान यालाही अटक करण्यात आली असून, तो सध्या पटण्याच्या बेऊर कारागृहात आहे.
संदीप कुमारला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे, जेणेकरून या तस्करी रॅकेटच्या इतर सदस्यांचा तपास लावता येईल.
एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे नेटवर्क देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकते. जप्त करण्यात आलेली शस्त्रे व रोख रक्कम हे संगठित गुन्हेगारी नेटवर्कचे संकेत देतात. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की ही तस्करी नागालँडपासून बिहारपर्यंत विस्तारलेली आहे.पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पुढील कारवाईसाठी पुरावे गोळा करत आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी.ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. तपास सुरूच असून, लवकरच आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी