‘एकात्म मानव दृष्टिकोन’ हीच खरी जागतिक मानवतेची दिशा — राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय तत्त्वज्ञानातील ‘एकात्म मानव दृष्टिकोण’ हीच खरी जागतिक मानवतेची दिशा आहे. भारतीय संस्कृती ही एकात्मता, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित असून ‘धर्म’ ही केवळ धार्मिक संकल्पना नसून सभ्य आचारसंहितेची जीवनपद्धती आहे,”
‘एकात्म मानव दृष्टिकोन’ हीच खरी जागतिक मानवतेची दिशा — राज्यपाल आरिफ मोहम्मद खान


पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय तत्त्वज्ञानातील ‘एकात्म मानव दृष्टिकोण’ हीच खरी जागतिक मानवतेची दिशा आहे. भारतीय संस्कृती ही एकात्मता, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित असून ‘धर्म’ ही केवळ धार्मिक संकल्पना नसून सभ्य आचारसंहितेची जीवनपद्धती आहे,” असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे भारतीय तत्त्वज्ञान अनुसंधान नवी दिल्ली, केंद्रीय हिन्दी निदेशालय (नवी दिल्ली) आणि सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्च (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एकात्म मानवदर्शन आणि त्याची समकालीन प्रासंगिकता’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्‌घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्चचे हरिभाऊ मिरासदार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, संदीप पालवे, सागर वैद्य ,बागेश्री मंठाळकर ' संगीता जगताप, अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर शंतनु लामधाडे , लोखंडे सर , अधिष्ठाता प्रा. विजय खरे , प्रा. सुप्रिया पाटील , प्रा. संजय तांबट , प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे आणि विचारवंत अभिजित यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष भर पडली.

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, “भारतीय तत्त्वज्ञानात ‘सनातन धर्मा’सोबतच ‘युगधर्म’ आणि ‘कालधर्म’ यांचीही संकल्पना आहे. काळानुसार बदल होत असले तरी धर्माचे मूळ तत्त्व मानवतेच्या उत्कर्षावर आधारित आहे. राम आणि कृष्ण हे अनुक्रमे ‘मर्यादा पुरुषोत्तम’ आणि ‘लीलापुरुषोत्तम’ असले तरी दोघांचे उद्दिष्ट एकच होते — समाजातील नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना.”

ते पुढे म्हणाले, “१९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली मानवाधिकारांची घोषणा झाली; पण हजारो वर्षांपूर्वी भारताने ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ हा सार्वत्रिक कल्याणाचा संदेश जगाला दिला. हीच भारतीय संस्कृतीची अनोखी देण आहे.”

शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले, “‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे विचार आत्मा आणि परमात्म्याच्या एकत्वाचा संदेश देतात. या आध्यात्मिक एकात्मतेतूनच खऱ्या मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा उदय होतो. विविधतेतून एकता हेच भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे वैशिष्ट्य आहे.”

कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षण केवळ नोकरीकेंद्रित न ठेवता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर विद्यापीठ भर देत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांशी सहकार्य करून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंपरा आणि नवोन्मेष यांचा संगम साधत भारताला ‘विचार नेतृत्व’ प्रदान करणे हेच विद्यापीठाचे ध्येय आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र शिंगणापूरकर यांनी केले, तर प्रा. डॉ. हरीश नवले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.आणि चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली सूत्रसंचालन तत्त्वज्ञान विभागाच्या विद्यार्थीनीने केले. चर्चासत्राला देशभरातील तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande