सोलापूर - एक लाख खातेदारांचे पैसे अडकले
सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापुरातील नावाजलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई करीत बंधने घातली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. बुधवारी (दि. 8) अनेक शाखांमध्ये खातेदारांनी गर्दी करीत पैशाची मागणी केली. बँक अडचणीत आल्याने एक लाखा
सोलापूर - एक लाख खातेदारांचे पैसे अडकले


सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापुरातील नावाजलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई करीत बंधने घातली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. बुधवारी (दि. 8) अनेक शाखांमध्ये खातेदारांनी गर्दी करीत पैशाची मागणी केली. बँक अडचणीत आल्याने एक लाखाहून अधिक खातेदारांचे पैसे अडकले. बार्शीतही खातेदारांनी बॅकेच्या शाखेसमोर गर्दी केली.

रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय समर्थ बँकेला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. नव्याने कोणालाही कर्ज देता येणार नाही, बचत व चालू खात्यातून रक्कम काढता येणार नाही. कोणतीही मालमत्ता विक्री करता येणार नसल्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. पुढील सहा महिने हे आदेश लागू असणार आहेत. यामुळे समर्थ बँक चांगलीच अडचणी आली आहे. समर्थ बँकेतील एक लाख खातेदारांना याचा फटका बसणार आहे.

समर्थ बँकेच्या राज्यात 32 शाखा आहेत. बँकेच्या ठेवी गेल्या काही वर्षात कमी होऊन 650 कोटींवर आल्या. मोठ्या कर्जदारांकडे 400 कोटींचे कर्ज थकित आहे. बँकेचा एनपीए सव्वाशे कोटींवर आला आहे. चालू खात्यात खातेदारांचे 100 कोटी आहेत तर बचत खात्यातील आकडा समजू शकला नाही.

एवढ्या मोठ्या रकमा अडकून पडल्याने बँकेतून व्यवहार करणारे व्यापारी, बडे खातेदार यांच्यापासून सर्वसामान्य खातेदारांपर्यंत सर्वजण अडचणीत सापडले आहेत. सहा महिन्यासाठी हे निर्बंध आहेत परंतु आम्ही रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात आहोत. निर्बंध शिथिल करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अडीचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यातील सव्वाशे कोटी रुपये आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande