
धुळे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच धुळ्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. याठिकाणी शिवसेना शिंदेसेनेने काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने धुळ्यामध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी शिंदेसेनेने चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. धुळ्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यात शिवसेना शिंदे गटाला मोठं यश आले आहे. आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमधील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या पिंपळनेर नगरपरिषदेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांतर्फे रणनीती आखण्यात येत असून शिंदेसेनेत झालेल्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप या सर्वच पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात धुळ्यामध्ये राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी धुळ्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर