
लातूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। शेतकरी अन्नदाता ऊर्जदाता, इंधनदाता झाला आता हायड्रोजनदाता होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लातूर जिल्ह्यात दिली.लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 43 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार असल्याचे म्हटले. “शेतकऱ्यांचे कल्याण आणि भले व्हावे, यासाठी आपण कार्यरत आहोत. देशाच्या विकासात जीडीपी हा महत्त्वाचा मापदंड आहे, परंतु त्यात शेतीचा वाटा कमी आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे कारण गावात रस्ते नाहीत, रोजगार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा विचार बदलला पाहिजे.”, असे म्हणत गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
आपल्याकडे अनेक दबावगट आहेत, पण शेतकऱ्यांचा दबावगट नाही. किल्लारीचा कारखाना ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे. देशात 530 साखर कारखाने असून त्यावर सुमारे अडीच कोटी लोकांचे भविष्य अवलंबून आहे. देशात 365 लाख टन साखरेचे उत्पादन होते आणि या बाबतीत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. उत्तर प्रदेशचे अर्थकारण साखर उद्योगावर आधारित आहे, अशी माहितीही गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी ऊस उत्पादन वाढविण्याचे आवाहन करताना म्हटले, “शेतकरी अन्नदाता नंतर ऊर्जदाता झाला, ऊर्जदातानंतर इंधनदाता झाला आणि आता तो हवाईदात्याबरोबरच हायड्रोजनदाता होणार आहे, हे कठीण असले तरी अशक्य नाही.”, असे गडकरी यांनी म्हटले. दरम्यान, या कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis