

अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। एकविसावे शतक भारताचे आहे. त्यामुळे जगाला दिशा देऊ शकणारे युवक घडविणे आवश्यक आहे. 2047 मधील विकसित भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संस्कारक्षम पिढी तयार करणे आवश्यक आहे. विपश्यना केंद्राच्या माध्यमातून या कामाला गती मिळणार आहे. त्यासाठी विपश्यना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या कोंडेश्वर रोड येथील बोधीभुमि संस्कार केंद्राचा आज पायाभरणी सोहळा आज पार पडला. यावेळी आमदार रवि राणा, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कमलताई गवई, किर्ती गवई, रविराज देशमुख आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, पुढील पिढी घडविण्यासाठी संस्कार केंद्र उभे राहणे आवश्यक आहे. संस्कारामुळे प्रगल्भ व्यक्ती तयार होऊन एक मजबूत पिढी तयार होईल. विपश्यना केंद्राच्या योगदानातून समाज निर्माण होणार आहे, तसेच समाजाला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे केंद्र हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकुल व्हावे. तथागत गौतम बुद्धांनी जगाचे कल्याण करणारी शिकवण दिली आहे. ही शिकवण पुढे नेण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देत आहे. कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याठिकाणी विपश्यना केंद्रासह गौतम बुद्धांची मुर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, वसतिगृह, वाचनालय करण्यावर भर देण्यात येणार आहे. केंद्राचा विकास करताना आराखडा तयार करावा. केंद्राच्या संस्थेने आवश्यक असणाऱ्या बाबींचा या आराखड्यात समावेश करावा. यासोबतच ईर्विन चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार रवि राणा यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला उपस्थितांनी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर श्री. बावनकुळे यांनी कुदळ मारून विपश्यना केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष कलावती भटकर, कोषाध्यक्ष अन्नपूर्णा दामले, सचिव अश्विनी भटकर, वैदर्भी मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील यश मिळविलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी