
रायगड, 11 नोव्हेंबर, (हिं.स.)। आर.सी.एफ. कुरुळ शाळेत आयोजित आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले की, कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात मोबाईलचा वापर शैक्षणिक उद्देशाने करण्यास शासनाने परवानगी दिली असली, तरी त्याचा वापर विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.
मोबाईलचा उपयोग गुगलसारख्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी करावा, मात्र चुकीचे संदेश, धर्मविरुद्ध मजकूर किंवा अयोग्य चित्रफिती पाहू नयेत किंवा पुढे पाठवू नयेत. तसेच फेसबुकसारख्या सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींची, विशेषतः मुलींनी, मैत्री स्वीकारू नये, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सरस्वती गायकवाड होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका श्रीमती भावे, संयोजक रवींद्रनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचनाने झाली. डॉ. जयपाल पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन श्रीमती भावे यांनी सत्कार केला.
आपत्ती व्यवस्थापन या सत्रात जिल्हा रुग्णालयातील वाहन चालक मयुर पाटील आणि रोहीत सुर्यवंशी यांनी आपत्कालीन परिस्थितीत 112 क्रमांकावर फोन करून मदत कशी मागवावी, तसेच बाळंतपण आलेल्या महिला किंवा अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात कसे नेले जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार अमित साळुंखे यांनी परवाना नसताना वाहन चालविल्यास होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती दिली.
शिबिरात इयत्ता 5वी ते 8वीचे सुमारे 280 विद्यार्थी, 8 शिक्षक आणि 2 कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जुईकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके