तळोजा नावडेतील शिव मंदिरावरून खळबळ; मंदिराच्या आडून गोरखधंद्यांचा आरोप
रायगड, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। नावडे येथील सिडकोच्या संपादित जागेवरील एका अनधिकृत शिव मंदिरावरून मोठे वादळ उठले आहे. या मंदिराच्या आडून अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक खुटारकर कुटुंबाने पत्रकार परिषदेत केला आहे. या प्र
तळोजा नावडेतील शिव मंदिरावरून खळबळ — मंदिराच्या आडून गोरखधंद्यांचा आरोप!


रायगड, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। नावडे येथील सिडकोच्या संपादित जागेवरील एका अनधिकृत शिव मंदिरावरून मोठे वादळ उठले आहे. या मंदिराच्या आडून अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक खुटारकर कुटुंबाने पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात त्यांनी सिडको, महापालिका आणि तळोजा पोलिसांवर संरक्षण देण्याचे गंभीर आरोप केले आहेत.

खुटारकर कुटुंबाने सांगितले की, “सिडकोच्या संपादित जागेवर एका परप्रांतीय व्यक्तीने अनधिकृत मंदिर उभारले असून, त्याला सिडको आणि स्थानिक प्रशासनाचे मूक आश्रय लाभले आहे.” त्यांनी या संदर्भात अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही संबंधित विभागांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. “कारवाईऐवजी अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे जबाबदारी ढकलून या बांधकामाला संरक्षण दिले,” असे खुटारकर यांचे म्हणणे आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, या जागेवर अंमली पदार्थांचा व्यापार चालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आमचा मंदिराला विरोध नाही, पण मंदिराच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना विरोध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. खुटारकर यांनी पुढे सांगितले की, “स्थानिक नागरिकांवर प्रशासन तात्काळ कारवाई करते, मात्र परप्रांतीयांकडून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर सिडको आणि पोलिस प्रशासन मौन बाळगते.” त्यांनी सिडकोला इशारा दिला की, “अशा दुटप्पी कारभाराला चालना दिली गेल्यास स्थानिकांनी जमिनी देणे थांबवावे.” या प्रकरणावर पनवेल महापालिकेचे प्रभाग अधीक्षक अरविंद पाटील यांनी सांगितले की, “सिडकोने या प्रकरणी पत्र दिले आहे. धार्मिक स्थळांच्या अनधिकृत बांधकामांबाबत समिती स्थापन करण्यात आली असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेतला जाईल.”

नागरिकांचा प्रश्न आहे — “या प्रकरणाची चौकशी होणार का, की मंदिराच्या आडून सुरू असलेल्या गोरखधंद्यांना पुन्हा अभय दिले जाणार?”

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande