
सोलापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी करमाळ्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या सुमारे 55 शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे बागल विरुद्ध जगताप गटातील संघर्ष आता चांगलाच पेटल्याचे दिसत आहे.
माजी आ. जयंतराव जगताप यांना नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा व कुर्डूवाडी येथे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.या निवडणुकीत दिग्विजय बागल यांना विश्वासात घेतले नाही. विधानसभा निवडणुकीत बागल यांनी 40 हजार मतदान घेतले; परंतु त्यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष करत जगताप यांच्यावर निवडणुकीची धुरा सोपवल्याने बागल गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते. या नाराजीचे पर्यावसन सामूहिक राजीनाम्यात झाले.
मकाई कारखान्याचे संचालक सतीश निळ, आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, माजी संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करमाळा येथे आज बैठक घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. दिग्विजय बागल यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड