
चंद्रपूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
रेतीने भरलेला हायवा जप्त करून तब्बल दहा दिवस चिमूर ठाण्यात ठेवल्याबाबत पोलिस अधीक्षकांनी अपर पोलिस अधीक्षकांमार्फत ब्रह्मपुरीचे एसडीपीओ राकेश जाधव यांची चौकशी केली. याबाबत चौकशी करून त्याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी पोलिस महासंचालकांकडे पाठविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
२८ ऑक्टोबरच्या रात्री एसडीपीओ जाधव यांनी गस्तीदरम्यान चिमूर येथील रेतीने भरलेला हायवा पकडून चिमूर ठाण्यात उभा केला. मात्र, त्याची फिर्याद, जप्ती, पंचनामा किंवा स्टेशन डायरी नोंद केली नाही. परिणामी, हायवा दहा दिवस ठाण्यात बेवारस स्थितीत उभा होता. याबाबतची तक्रार पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे होताच, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश अपर पोलिस अधीक्षक इश्वर कातकडे यांना दिले होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षकांमार्फत आयजीकडे पाठविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव