
कोल्हापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
कोल्हापूर आणि जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक आणि महत्वाचे शिलेदार फोडण्याचे राजकारण जोरात सुरू आहे. यामुळे अस्वस्थ आणि संतापलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी आता शिवसेना शिंदे गटाला थेट आव्हान देताना पालक मंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यानां लक्ष्य केले.
'माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे, हलगी आता कुठं तापू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार असून आणि आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार आहे. असा इशारा दिला. याला ना. प्रकाशआबिटकर यांनी तितक्याच संयमाने आणि समर्पक प्रत्युत्तर दिले.
काही दिवसापूर्वी आ सतेज पाटील यांचे मुख्य शिलेदार असलेले माजी नगरसेवक शांरगधर देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचाच प्रभागात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आ. पाटील यांनी काही कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश घडवून आणला. यानिमित्ताने घेतलेल्या एका सभेत आ. पाटील यांनी आपली आक्रमक भुमिका प्रकट केली. ते म्हणाले की 'माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे, हलगी आता कुठं तापू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार असून आणि आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार आहे. या निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे. मात्र, या सर्वांचा समाचार आपण या प्रचारांमध्ये घेणार आहे. आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा आता वॉर्डात वाटला जाईल, याची सर्व कागद देणार आहे.हे सरकार रीलच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवण्याचे काम करीत आहे.
यावेळी शारंगधर देशमुख यानांही आ.पाटील यांनी लक्ष केले. ज्यांनी आम्हाला फसवले ते तुम्हालाही फसवतील अशा गद्दाराना त्यांची जागा दाखवली जाईल असा इशाराही दिला.
दरम्यान, सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सतेज पाटील यांच्याकडूनच आरोग्य विभागामध्ये नेमके काय भ्रष्टाचार झाले आहेत ते मी समजून घेईन; आम्ही दोघे मिळून ते भ्रष्टाचार बाहेर काढू, असा खोचक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की आम्हाला लोकांनी संधी दिली आहे ते चांगलं काम करण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी नाही. पाटील यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही सामुदायिकपणे भ्रष्टाचार बाहेर काढू. वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार आम्ही महानगरपालिका निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहोत,
अंजली दमानिया यांनी 500 कोटींची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना आबिटकर म्हणाले की, अंजली दमानिया यांनी केलेले द्विटचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही. आरोग्य विभागामध्ये अशा पद्धतीची कोणतीही अनियमितता झालेली नाही. अंजली दमानिया यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायला हवं असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar