
पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेला पहिल्याच दिवसी शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसी सायंकाळी सहापर्यंत ११२७ मिळकतधारकांनी ६ कोटी २८ लाख रुपये थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा केली.महापालिकेची समाविष्ट गावांमध्ये २ हजार कोटी, मोबाइल टॉवरची ४,२५० कोटी आणि जुन्या हद्दीतील, अशी ६ लाख ३७ हजार ६०९ मिळकतींची एकूण १३०९७.११ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत दोन महिने अभय योजना राबविली जाणार आहे. या योजनेतून थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सूट मिळणार आहे. निवासी, बिगर निवासी व मोकळ्या जागा अशा ४.८१ लाख मिळकतींच्या लाभार्थ्यांना अभय योजनेचा फायदा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु