
परभणी, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड विभागात गाड्यांमध्ये तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांवर अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष तपास मोहीम सुरू केली आहे. रेल्वे संरक्षण दल आणि व्यावसायिक विभाग यांच्या संयुक्त पथकांद्वारे नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगर, वसमत, हिंगोली, वाशीम, गंगाखेड आदी स्टेशनांवर तसेच विभागातील विविध गाड्यांमध्ये तपासणी सुरू असून, परवाना नसताना वस्तू विक्री करणार्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
प्रवासी सुरक्षा वाढवणे, स्वच्छ व सुरक्षित प्रवास वातावरण निर्माण करणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून रेल्वे कायदा 1989 च्या कलम 144(1) नुसार परवाना नसताना रेल्वे स्थानकांवर अथवा गाड्यांमध्ये विक्री केल्यास एक वर्षापर्यंत कारावास, दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. प्रवाशांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ व इतर वस्तू खरेदी करावी, अनधिकृत विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ रेल्वे हेल्पलाईन : 139 किंवा जवळच्या स्थानक अधिकार्यांना कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis