



- राज ठाकरेंकडून भावनिक संदेश जारी
- आजारी असलेल्या संजय राऊतांनीही लावली उपस्थिती
मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील स्मृतीस्थळावर भावनिक वातावरण पाहायला मिळाले. सकाळी सात वाजताच राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत होते, बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घटना म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 11 वर्षांनंतर एकाच वेळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब स्मृतीस्थळी पोहोचले. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे हेही बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या सोबत स्मृतीस्थळी दाखल झाले. अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदू मामा आणि रश्मी ठाकरे काही काळ स्मृतीस्थळी एकत्र बसले. गणपती, दिवाळी, भाऊबीजेसारख्या अनेक प्रसंगी ठाकरे कुटुंब एकत्र आले असले तरी बाळासाहेबांच्या स्मारकावर दोन्ही भावंडे 11 वर्षांनी एकत्र दिसल्याने शिवसैनिकांमध्ये विशेष उत्सुकता आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. यावेळी राज आणि उद्धव यांच्यात थोडी चर्चा झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे आजचा दिवस शिवसैनिकांसाठी भावनिक ठरला.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊतही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झाले. प्रकृतीच्या कारणांमुळे 31 ऑक्टोबरपासून ते घराबाहेर पडत नव्हते; मात्र स्मृतिदिनानिमित्त त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शर्ट-पँट आणि तोंडाला मास्क लावून ते शिवाजी पार्कमध्ये आले. गाडीतून उतरताच त्यांनी आपले बंधू सुनील राऊत यांचा हात धरून स्मृतीस्थळापर्यंत चालत जात बाळासाहेबांना अभिवादन केले.
राज ठाकरे यांचा भावनिक संदेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक संदेश जारी केला आहे. ते म्हणाले शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.
पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule