
जळगाव, 19 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील सावदा, भुसावळ, आणि जामनेर या ठिकाणी प्रत्येकी एक-एक असे भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले. यामुळे राज्यात भाजपचं पहिलं खातं उघडलं आहे. भुसावळ येथे प्रभाग 7 ब मधील प्रीती मुकेश पाटील, सावदा येथील प्रभाग 7 मधील रंजना भारंबे आणि जामनेर येथील प्रभाग 11 ब मधील उज्वला दीपक तायडे हे भाजप उमेदवार बिनविरोध ठरले. याबाबत अधिकृत घोषणा मात्र माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शानदार सुरुवात केली आहे. अर्थात जिल्ह्यातील सावदा, भुसावळ आणि जामनेर असे प्रत्येकी एक-एक असे भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहे. विशेषतः नामनिर्देशन पत्र छाननीच्या दिवशीच हा विजय मिळवल्याने भारतीय जनता पक्षाचे मनोबल प्रचंड वाढले आहे. भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ मध्ये प्रीती मुकेश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सारिका युवराज पाटिल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना पक्षाने दिलेला AB Form मध्ये तांत्रिक चुका व त्रुटी आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी बाद ठरविल्याची माहिती मुकेश नरेंद्र पाटील यांनी दिली. प्रीती मुकेश पाटील यांच्या विरोधात इतर कोणीही अपक्ष उमेदवार शिल्लक नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांसह विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
जामनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार उज्वला दीपक तायडे या आज बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधातील मंगला भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान अर्ज बाद ठरवला आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दिपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. सावदानगर पालिका सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाच्या उमेदवार रंजना जितेंद्र भारंबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावदा, भुसावळ आणि जामनेर असे प्रत्येकी एक-एक असे भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहे. विशेषतः नामनिर्देशन पत्र छाननीच्या दिवशीच हा विजय मिळवल्याने भारतीय जनता पक्षाचे मनोबल प्रचंड वाढले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर