
जळगाव, 19 नोव्हेंबर (हिं.स.) जळगाव शहराच्या तापमानाने १८ नोव्हेंबर रोजी पहाटे २३ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला असून, पारा थेट ७.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. भारतीय हवामान खाते आणि ममुराबाद वेधशाळेकडे या विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागाने अजून दोन तीन दिवसांपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रात्री व पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. खरंतर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानाची सरासरी १४ ते १५ अंश सेल्सिअस इतकी असते. मात्र, यंदा हीच सरासरी ९ ते १० अंशांवर आली आहे. याचा अर्थ, सरासरीपेक्षा यंदा तापमानाचा पारा तब्बल ४ अंशांनी कमी झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात मोठी घट होत असून, नोव्हेंबर महिन्यातच थंडीचा एवढा कहर असताना डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हा थंडीचा जोर अजून वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जळगावच्या तापमानाने २३ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे. जळगावचा पारा ७.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. यापूर्वी, २००२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान ७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. दरम्यान, रात्रीच्या तापमानासोबतच २ दिवसाच्या तापमानातही घट झाली असून, दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. सध्या जिल्ह्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर