रायगड - गाणी–कोंढे गावाने रचला विकासाचा नवा अध्याय
रायगड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी–कोंढे ही एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुढे आली आहे. ‘पारदर्शक कारभार’, ‘गतिमान प्रशासन’ आणि ‘शाश्वत विकास’
From digital gram panchayat to water conservation; Gaanai-Kondhe village creates a new chapter of development


रायगड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी–कोंढे ही एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुढे आली आहे. ‘पारदर्शक कारभार’, ‘गतिमान प्रशासन’ आणि ‘शाश्वत विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित अनेक उपक्रम ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे राबवण्यात आले. या उपक्रमांची परिणामकारकता पाहता गाणी–कोंढे गावाने तालुक्यातच काय, तर जिल्ह्यातदेखील आदर्श निर्माण केला आहे.

अभियानाच्या ‘डिजिटल आणि पारदर्शक प्रशासन’ या घटकांतर्गत ग्रामपंचायतीने स्वतंत्र वेबसाईटचे लोकार्पण केले असून, निधी, विकासकामे आणि सरकारी आदेशांची माहिती गावकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. ग्रामपंचायत वाचनालयामुळे माहितीचा अधिकार, डिजिटल साक्षरता आणि वाचन संस्कृतीही बळकट होत आहे.

‘गतिमान सेवा वितरण’ या निकषानुसार गावातच विशेष शिबिरे भरवून जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी तसेच महसूल विभागातील मालमत्ता पत्रक व ७/१२ उतारे जागेवर देण्यात आले. यामुळे प्रशासन खऱ्या अर्थाने जनतेच्या दारात पोहोचत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना मिळाला.

‘शाश्वत विकास’ या घटकांतर्गत ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. लोकसहभागातून पूर्ण झालेल्या या बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढून गावाला उन्हाळ्यातील टंचाईवर मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कृषी सक्षमीकरणासाठी महिला व पुरुष शेतकरी गटांची स्थापना आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने आयुष्मान भारत आरोग्यपत्राचे वितरण, दिव्यांगांना ओळखपत्र व सोलर दिव्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने गावाने ठोस पावले टाकली आहेत.

या उपक्रमांना पंचायत समिती श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी मा. माधव जाधव, कृषी विस्तार अधिकारी राधा कराळे आणि स्वदेस फाउंडेशनचे नाथा कटारे यांनी उपस्थित राहून प्रशंसा केली. सरपंच आदित्य कासरुंग, ग्रामविकास अधिकारी अभिजित माने यांच्या नेतृत्वासह ग्रामस्थ, महिला व युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. गाणी–कोंढे ग्रामपंचायतीने समृद्ध पंचायतराज अभियाना’ची प्रभावी अंमलबजावणी करून उभारलेला विकासाचा आदर्श, जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande