दिल्ली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !
प्रस्तावना : भारतीय राजधानी दिल्ली हे शहर केवळ प्रशासकीय केंद्र नसून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे अद्वितीय प्रतीक आहे. राष्ट्रपती भवन, राजपथ, संसद भवन, विविध कलादलांची परंपरा, उद्योगविश्व आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकसंस्कृती या सर्वांनी
दिल्ली ते इंद्रप्रस्थ


दिल्ली शंखनाद महोत्सव


प्रस्तावना : भारतीय राजधानी दिल्ली हे शहर केवळ प्रशासकीय केंद्र नसून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे अद्वितीय प्रतीक आहे. राष्ट्रपती भवन, राजपथ, संसद भवन, विविध कलादलांची परंपरा, उद्योगविश्व आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकसंस्कृती या सर्वांनी मिळून दिल्लीचा बहुआयामी स्वभाव घडवला आहे. हीच दिल्ली प्राचीन काळात ‘इंद्रप्रस्थ’ म्हणून ओळखली जात होती महाभारतकालीन पांडवांची भव्य राजधानी आणि सांस्कृतिक वैभवाची मूळ जननी. कालांतराने आक्रमणांच्या मालिकेत या शहराची मूळ ओळख धूसर झाली; तिच्या नावावर, संस्कृतीवर आणि जीवनदृष्टीवर परकीय छटा चढल्या. आज संपूर्ण देशभरातून दिल्लीला तिचे प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाव ‘इंद्रप्रस्थ’ परत मिळावे, अशी जोरदार मागणी होत आहे. या राष्ट्रीय चळवळीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ही सक्रिय भूमिका बजावत आहे.

दिल्लीचा इतिहास आणि ऐतिहासिक पुरावे ! : इंद्रप्रस्थ हे महाभारतकालीन नगर असून पांडवांची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. यमुनेच्या काठी वसलेले हे नगर त्या काळी कला, शौर्य, प्रशासन आणि वैभवाचे केंद्र मानले जात होते. ऐतिहासिक आणि पुरातत्त्व संशोधनातील पुरावे बघितल्यास, मौर्य, शुंग, कुशाण, गुप्त, राजपूत, सुलतान आणि मोगल काळातील विविध अवशेष दिल्लीमध्ये आढळले आहेत. विशेषतः पुराना किल्ल्यात १९५५ व २०१३-१४ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने (ASI) केलेल्या उत्खननांत ‘पेन्टेड ग्रे वेअर’ (Painted Grey Ware) संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. या संस्कृतीचा संबंध महाभारतकालाशी मानला जातो. अनेक प्राचीन ग्रंथ, प्रवासी आणि इतिहासकार दिल्ली क्षेत्राला ‘इंद्रपत्त’ किंवा ‘इंद्रप्रस्थ’ या नावानेच ओळखतात. ही सांस्कृतिक स्मृती आजही आधुनिक दिल्लीच्या परिचयात जपली गेली आहे.

नावबदलाचा सांस्कृतिक अर्थ ! : इंद्रप्रस्थ हे नाव फक्त ऐतिहासिक नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचेही प्रतीक आहे. महाभारताच्या कथेनुसार पांडवांनी यमुनेच्या काठी असलेल्या खांडववनातून (कांडवप्रस्थ) नवे भव्य नगर उभारले आणि देवाधिदेव इंद्राच्या सन्मानार्थ त्या नगराला ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव दिले, त्यामुळे हे नाव दैवी परंपरा, सांस्कृतिक ओळख आणि राजसत्ता या तीनही घटकांचे प्रतिनिधित्व करते. नव्या पिढीला त्यांच्या इतिहासाशी जोडणारे, स्वाभिमानाची भावना जागवणारे हे नाव दिल्लीच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. दिल्लीला ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव दिल्यास पर्यटन, स्थानिक उद्योग, हॉटेल्स आणि हस्तकला क्षेत्रासदेखील मोठा फायदा होऊ शकतो. राजकीय वा प्रशासनिक पातळीपलिकडे हा बदल राष्ट्रीय सांस्कृतिक पुनर्जागरणाचा एक मोठा टप्पा ठरू शकतो.

‘इंद्रप्रस्थ’चा मागोवा, संशोधन आणि मागणी ! : ‘द्रौपदी ड्रीम ट्रस्ट’च्या नीरा मिश्रा यांनी इंद्रप्रस्थच्या इतिहासावर उल्लेखनीय संशोधन करून या संकल्पनेला शास्त्रशुद्ध आधार दिला आहे. पुराना किल्ल्यातील उत्खनन, महाभारत आणि पौराणिक संहितांचे उल्लेख, चीन–ग्रीस प्रवाश्यांची नोंद, भौगोलिक प्रतिपादन आणि ऐतिहासिक साहित्य यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी ‘इन्द्रप्रस्थ रीविसिटेड’ (Indraprastha Revisited) हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले आहे. भाजप खासदार प्रविण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करण्यासाठी पत्राद्वारे विनंती केली आहे. ते जुन्या दिल्लीवरील रेल्वे स्थानकाचे नाव ‘इंद्रप्रस्थ जंक्शन’ आणि दिल्ली विमानतळाचे नाव ‘इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा’ हे नाव, तसेच पांडवांच्या पुतळ्यांची उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शंखनाद महोत्सवात भूमिकेचे महत्त्व ! : ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा राष्ट्रीय स्तरावरील भव्य कार्यक्रम १३–१४ डिसेंबर २०२५ रोजी ‘भारत मंडपम’ (इंद्रप्रस्थ) येथे होत आहे. या महोत्सवात शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, प्राचीन भारतीय सुरक्षा व्यवस्था, शौर्याची उजळणी आणि सांस्कृतिक वारसा या सर्व गोष्टींचा जागर केला जाणार आहे. हा महोत्सव केवळ सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे स्फुलिंग जागवणार कार्यक्रम न राहता ‘दिल्ली ते इंद्रप्रस्थ’ या परिवर्तनाच्या प्रक्रियेला समाजाच्या एकत्रित सहभागाने गती देणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. तर मग चला, इंद्रप्रस्थाचा शंखनाद करण्यासाठी पुढे सरसावूया!

- चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था, संपर्क : ७७७५८५८३८७

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande