
रायगड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। “हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम” शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे व राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबर २०२५ रोजी खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून नियोजनासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीस उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील नांदेड, नागपूर आणि नवी मुंबई या तीन ठिकाणी होणार असून प्रत्येक ठिकाणी क्षेत्रीय आयोजन समिती स्थापन करण्यात येत आहे.
कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात येणार असून सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व्हीआयपी व्यवस्थापन, सभागृह, स्वागत, सुरक्षा, स्वच्छता, लंगर, सार्वजनिक परिवहन, पाणीपुरवठा, महिला सुरक्षा, प्रचार व प्रसार आदी विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. “हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्याच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. सर्व विभागांनी एकदिलाने प्रयत्न करून या आयोजनाला अत्युत्कृष्ट स्वरूप द्यावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठकीच्या शेवटी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके