
मुंबई, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची एसआयटी प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते महेबूब शेख यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमधून केली आहे.
मेहबूब शेख म्हणाले की, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी संबंधित लोकांवर आरोप होत असलेल्या या प्रकरणात एसआयटी स्थापन न करण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. बीडमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यावर खोटी विनयभंगाची तक्रार झाली, तेव्हा फडणवीस यांनी तातडीने एसआयटी नेमली आणि सुमारे ३५० महिलांचे जबाब घेतले. मग फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली असताना, आणि जबाबदार लोकांची नावे माहिती असताना, फडणवीस एसआयटी का स्थापन करत नाहीत? असा सवाल मेहबूब शेख यांनी केला.
यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले की,एका प्रेसमध्ये डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या पत्राचे अर्धवट वाचन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या पत्रात एका खासदाराच्या पीएने संपदा मुंडेंना खासदारांशी बोलण्यास सांगितले होते आणि खासदारांनी आरोपांना चुकीचे ठरवत भविष्यात असे होणार नाही अशी हमी दिली होती, असे म्हटले होते. मात्र, पत्रातील महत्त्वाचे मुद्दे, जसे की तुम्ही बीडचे असल्यामुळे आरोपींना फिट देत नाही, हे वाक्य आणि पोलिसांच्या तक्रारी न नोंदवण्याबाबतचे म्हणणे हेतुपुरस्सर वगळण्यात आले आहे. या खासदाराची आणि त्यांच्या पीएची ओळख नार्को चाचणीद्वारे उघड झाली पाहिजे, अशी मागणी मेहबूबा शेख यांनी केली आहे.
महबूब शेख म्हणाले की, आधी ती महिला डॉक्टर चांगली होती, पण तीने डीवायएसपी राहुल धस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ती कशी काय वाईट झाली? 19 जून रोजी त्या डॉक्टरने राहुल धस यांच्याकडे तिच्यावर दबाव असल्याची तक्रार केली. त्यानंतर एकाच महिन्यात तिच्या विरोधात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली. एकाच महिन्यात ती डॉक्टर कशी काय वाईट झाली? त्या तीन अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता? या प्रकरणाचा सविस्तर तपास व्हावा, त्या तीनही अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. डॉक्टरच्या कुटुंबीयांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तपासाची मागणी केली असताना ती पूर्ण न झाल्याबद्दलही महबूब शेख यांनी बोलताना सांगितले आहे.
पुढे बोलताना महबूब शेख म्हणाले की, अजित पवारांनी महिला अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा यांना दम दिला होता, तरीही त्या मागे हटल्या नाहीत, त्यांना या तपासाच्या प्रमुख बनवा अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. तसेच यावेळी त्यांनी हगवणे प्रकरणाची सखोल तपास व्हावी अशी मागणीदेखील महबूब शेख यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर