वृक्षारोपणासह संवर्धनासाठी समाजाने पुढे यावे - पो. निरीक्षक महादेव मांजरमकर
परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनासाठी समाजाच्या सर्वच स्तरातून पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे, असे मत नवा मोंढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी व्यक्त केले. परभणी येथील यश क्रीडा मंडळाच्य
वृक्षारोपणासह संवर्धनासाठी समाजाने पुढे यावे - पो. निरीक्षक महादेव मांजरमकर


परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनासाठी समाजाच्या सर्वच स्तरातून पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे, असे मत नवा मोंढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी व्यक्त केले.

परभणी येथील यश क्रीडा मंडळाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त सुपर मार्केट परिसरातील नवा मोंढा पोलिस स्टेशनलगत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला होता. मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांनी पुढाकार घेत हा परिसर स्वच्छ करून तेथे वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पो.नि. मांजरमकर, रिपाईचे राज्य सरचिटणीस डी. एन. दाभाडे, मनसे नेते सोनू लाहोटी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, तसेच परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील तुरुकमाने आणि राहुल घनसावंत उपस्थित होते.

पुढे बोलतांना मांजरमकर म्हणाले, वृक्षतोडीमुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत असून, त्यामुळे जागतिक तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. जग एका नव्या संकटाला सामोरे जात आहे. मानवजातीचे अस्तित्व सुरक्षित ठेवायचे असेल, तर प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. या कार्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरातून पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. यश क्रीडा मंडळाने वृक्षारोपणासारखा स्तुत्य उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता निर्माण होऊन पर्यावरण संतुलन राखण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यश क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande