
परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।परभणी तालुक्यातील सांवगी खुर्द येथील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी रस्त्यावरील अतिक्रमणामुळे उद्भवलेल्या अडचणींच्या निषेधार्थ पूर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
गावातील बहुतांशी शेतकरी व ग्रामस्थ शेतीसाठी या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र, या रस्त्यावर झालेले अतिक्रमण आणि अरुंद मार्गामुळे शेतकर्यांना वाहतुकीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी परभणी तहसील कार्यालयात लेखी निवेदन देऊन तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या अधिकार्यांनी स्थळ पाहणी करून पंचनामे केले; मात्र प्रत्यक्षात अतिक्रमणावरील कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी पूर्णा नदीपात्रात उतरून आंदोलनात सहभागी झाले.
दरम्यान, तहसील प्रशासनाने ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच मातोश्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत सुमारे 4.5 किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र काही शेतकर्यांनी अडथळा निर्माण केल्याने काम ठप्प आहे. परंतु, सर्व अडथळे दूर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis