
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।वलगाव–चांदूरबाजार महामार्गालगतच्या शिराळा शेतशिवारात आज शुक्रवार सकाळी उघडकीस आलेल्या निर्घृण हत्याकांडाने परिसर हादरून गेला आहे. ओळख पटू न शकणाऱ्या एका तरुणाची क्रूर पद्धतीने हत्या करून त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आला आहे. मृतकाच्या शरीरावर चाकूचे मोठ्या प्रमाणात घाव असून यातून ही घटना अत्यंत रागाच्या भरात किंवा सूडातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या परिसरातील शेतातील मजूर सकाळी कामासाठी शेतात पोहोचले असता त्यांना जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसला असता त्यांनी तात्काळ ही माहिती वलगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक पथक यांनाही बोलावून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. मृतकाच्या हातावर गोंदवलेले नाव असल्याचे आढळले; मात्र खुनी किंवा खुनींनी मृतदेह जाळताना ते देखील मुद्दाम नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.डीसीपी गणेश शिंदे यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की, “मृतदेहावर चाकूचे अनेक घाव असून जळालेल्या अवस्थेत तो आढळला आहे. मृतकाची ओळख पटविण्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध दिसत आहे. घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यांवरून तपासाची दिशा ठरवली जात आहे.”हत्या नेमकी कुठे झाली? मृतदेह त्याच ठिकाणी जाळण्यात आला की अन्यत्रून आणून टाकण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी पोलिस विविध कोन तपासत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, आणि मागील काही दिवसांतील हरवलेल्या व्यक्तींची नोंद या सर्वांचा तपासात समावेश करण्यात आला आहे.दरम्यान, ओळख पटत नसल्याने मृतक कोण, कुठल्या कारणातून ही हत्या झाली, किती जणांनी मिळून हा गुन्हा केला—यावर अद्यापही पडदा आहे. वलगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी