गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। – शहरात आर.टी.ओ. रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने अल्पावधीतच जेरबंद केले आहे. या टोळीकडून कोयता, पिस्तूल, मोटारसायकली आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्
ेिहेकि


सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। – शहरात आर.टी.ओ. रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने अल्पावधीतच जेरबंद केले आहे. या टोळीकडून कोयता, पिस्तूल, मोटारसायकली आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी धसका बसवला आहे.

दिनांक १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास आर.टी.ओ. ऑफिस रोडवरील गणेशनगर बसस्टॉपजवळ समर्थ ज्वेलर्स दुकानात दोन इसमांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानमालक दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून पसार झाले.

या घटनेचा तपास गुन्हे शाखेने तातडीने हाती घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सात तपास पथके तयार करून सुमारे १२५ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे यतीमखाना परिसरात सापळा रचून तीन संशयितांना अटक करण्यात आली.

अटकेतील आरोपींची नावे साहिल दशरथ गायकवाड (२०), समर्थ समीर गायकवाड, आणि सार्थक दशरथ गायकवाड अशी आहेत. चौकशीतून या गुन्ह्यात अजिंक्य चव्हाण (रा. वारजे माळवाडी, पुणे), विशाल जाधव (रा. तुळजापूर) आणि एक अल्पवयीन मुलगा सामील असल्याचे उघड झाले.

या टोळीने दरोड्यापूर्वी गाडीची ओळख पटू नये म्हणून पांढऱ्या ॲक्टिव्हा गाडीला निळा रंग मारून वापरल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी लोखंडी कोयता, निळी प्लॅटिना मोटारसायकल, मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची ॲक्टिव्हा जप्त केली आहे.

तसेच समर्थ गायकवाड आणि अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी होटगी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवत ₹३९,००० लुटल्याची कबुली दिली असून त्या गुन्ह्याचाही उलगडा करण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील (गुन्हे/विशा), सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे आणि सायबर शाखेच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande