रायगड जिल्हा साहित्य संमेलन अलिबागमध्ये उत्साहात संपन्न
रायगड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठी भाषेचा जयघोष करत, साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी अलिबाग येथे उत्साहात पार पडला. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कलारंग सांस्कृतिक
मराठी संस्कृतीचा उत्सव — अलिबागात रंगला रायगड जिल्हा साहित्य संमेलन


रायगड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठी भाषेचा जयघोष करत, साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी अलिबाग येथे उत्साहात पार पडला. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच कोकण साहित्य परिषद शाखा अलिबाग यांच्या सहकार्याने हे संमेलन श्रीबाग येथील भंडारी भवन येथे 8 व 9 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात भव्य साहित्य दिंडीने झाली. कान्होजी आंग्रे समाधीस्थळापासून ते भंडारी भवनपर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीत “मराठी माझी माय” असा घोष करीत अलिबाग शहर दुमदुमले. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन या उद्देशाने राज्य शासनाच्या अनुदानातून हे संमेलन भरविण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार अरुण म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, राज्य साहित्य मंडळाचे सदस्य भरत गावडे व विठ्ठल कदम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, को.म.सा.प. रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी तसेच साहित्यिक नागेश कुलकर्णी, वैभव धनावडे, तपस्वी गोंधळी, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प वाणी यांनी केले. स्वागताध्यक्ष रमेश धनावडे यांच्या वतीने अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी स्वागतपर भाषण केले, तर साहित्यिका सुजाता पाटील यांनी आभार मानले. निवेदन प्रतिमा सुतार यांनी केले. संमेलनात चर्चासत्र, काव्यकट्टा, कथा वाचन, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन कलारंग संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande