
रायगड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। नॅशनल एज्युकेशन डे निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड आणि चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विधी साक्षरता आणि जनजागृती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करून बालविवाहमुक्त भारताची संकल्पना बळकट करणे हा होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका तृप्ती बोरे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विधी साक्षरतेचे महत्त्व आणि या जनजागृती अभियानाचे उद्दिष्ट समजावून सांगितले.
या प्रसंगी असिस्टंट एलईडीसीएस ॲड. पियुष गडे यांनी नॅशनल एज्युकेशन डेचा इतिहास, मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, तसेच मुलांचे हक्क आणि शिक्षणाचे मूल्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “राइट्स ऑफ चिल्ड्रन” संदर्भातील विविध कलमे आणि अधिकार समजावून दिले.
यानंतर डेप्युटी चीफ एलईडीसीएस ॲड. मनीषा नागावकर यांनी पोस्को कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड न्या. तेजस्विनी निरळे होत्या. त्यांनी “बालविवाहमुक्त भारत” या संकल्पनेवर भर देत बालविवाह हा सामाजिक गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. तसेच बालविवाहाची घटना आढळल्यास 1098 या चाइल्डलाइन क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी साक्षरतेच्या या उपक्रमातून शिक्षण, महिलांचे व मुलांचे हक्क आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके