
रायगड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने घेतला आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनांनुसार अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक शेकाप आणि काँग्रेससोबत मिळून लढविण्यात येणार असल्याची माहिती संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सतीश पाटील, संदीप पालकर, तनुजा पेरेकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भोईर यांनी सांगितले की, “महाविकास आघाडीतील समन्वय वाढवून जनतेच्या हिताचे प्रतिनिधी निवडून आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण झाली आहे.”
अलिबाग नगरपरिषदेच्या उमेदवारांसाठी नऊ ते दहा इच्छुकांची नावे समोर आली असून, सेवाभावाने काम करणाऱ्या तीन ते चार सक्षम उमेदवारांचा विचार करून अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. “जे कार्यकर्ते सातत्याने जनतेसाठी उभे राहिले, त्यांनाच प्रतिनिधित्वाची संधी दिली जाईल,” असे भोईर यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये सध्या उमेदवार ठरविण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील तसेच अलिबाग नगरपरिषदेतील शेकापचे स्थानिक नेते यांच्यासोबत वाटाघाटी होत आहेत. मतदारांच्या मानसिकतेचा व मागील कामांचा विचार करून प्रभावी उमेदवार उभे करून अलिबाग नगरपरिषदेवर सत्ता स्थापन करणे हा आघाडीचा उद्देश असल्याचेही प्रसाद भोईर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके