
रायगड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात साप आढळल्याच्या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या धोबी घाट रुममध्ये साप दिसल्याने कर्मचारी वर्ग आणि रुग्णांमध्ये घबराट पसरली. तात्काळ सर्पमित्रांच्या मदतीने त्या सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले.
अलिबाग जिल्हा रुग्णालयातील धोबी घाटात दररोज रुग्णांच्या वापरातील चादरी, बेडशीट, उशी कव्हर, गणवेश आणि इतर कपडे धुण्याचे काम केले जाते. कपडे धुतल्यानंतर ते या रुममध्ये सुकवून घडी करून पुन्हा रुग्णांना देण्यात येतात. मात्र या रुममधील अस्वच्छता, अस्ताव्यस्त कपड्यांचे ढीग आणि दुर्लक्षित परिसरामुळे साप व इतर दंशकारक प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या रुममध्ये स्वच्छतेचा अभाव असून बराच काळ निर्जंतुकीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे साप व उंदरांसारखे प्राणी आत शिरतात. अशा परिस्थितीत रुग्णालयात कार्यरत कर्मचारी आणि रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णसेवेशी संबंधित ठिकाणी अशी निष्काळजीपणा असू नये, अशी नागरिकांची भावना आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची दखल घेत परिसर स्वच्छ करण्याचे आणि आवश्यक निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी कर्मचारीवर्ग व नागरिकांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके